"महिला सक्षमीकरणाची वाटचाल प्रभावी हवी"

"महिला सक्षमीकरणाची वाटचाल प्रभावी हवी"



धुळे - ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त समस्त नारी शक्तीला आमच्या क्रीडा परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आणि याचं अनुषंगाने माझा आजचा लेख नारी शक्तीला समर्पित असेल,खरंतर प्रत्येक दिवस हा नारी शक्तीचा असायला हवा कारण तिच्या सारखं सामर्थ्य हे आज कोणाकडेच नाही,ती प्रत्येक क्षेत्रात पारंगत राहत तिच्या बलाढ्य अशा आत्मविश्वासामुळे त्या-त्या क्षेत्राचा विकास हा प्रगतीपथावर आहे, त्यामुळेच तिला तिच्या जीवनातील सामर्थ्याचे संपूर्ण स्वतंत्र हवं,विशेष म्हणजे ती पुरुषांच्या बरोबरीने आज अनेक क्षेत्रात उतुंग भरारी घेत सक्षम असल्याने "चूल आणि मूल" ही पडद्याआड संस्कृती बाजूला ठेवून तिचा आदर आपल्या समाजाने केला पाहिजे तेव्हाच 'नारी शक्तीचा जागर' खऱ्या अर्थाने होईल,आजही आपला समाज लिंगामुळे तिच्या कार्याला कमी लेखतो आणि हिचं बाब आपल्या समाजाला अधोगतीकडे घेऊन जाते खरंतर घर व समाज यांच्या विकासाच्या बाबतीत पुरुष व स्त्री या दोघांचे समान योगदान असतं तरी पण आपण ती महिला आहे म्हणून तिला पाहिजे तसं स्वतंत्र देऊ शकत नाही ही फार मोठी शोकांतिका आपल्या समाजासाठी आहे,आपल्या समाजाने महिला सक्षमीकरण म्हणजे काय..? हे समजुन घेण्याची फार गरज आहे कारण प्रत्येक क्षेत्रात तिला सक्षम होण्यासाठी स्वतंत्र हवं यासाठी विविध क्षेत्रातील स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे,कायदे व कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक,राजकीय,क्रीडा, उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी,सन्मान, समान हक्क व दर्जा प्रदान करणे या संपूर्ण प्रक्रियेला महिला सक्षमीकरण असं म्हणतात आणि या महिला सक्षमीकरणाची वाटचाल ही आपल्या समाज व्यवस्थेत प्रभावी हवी तेव्हाच नारी शक्तीला स्वतंत्र मिळेल व 'चूल आणि मूल' या संस्कृतीला आळा बसेल.

        ८ मार्च जागतिक महिला दिवस हा संपूर्ण विश्वात मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो कारण शैक्षणिक, सामाजिक,आर्थिक,राजकीय सांस्कृतिक व क्रीडा अशा क्षेत्रात नेतृत्वान महिलांचा गौरव म्हणुन हा दिवस समाजातील नारी शक्तीला प्रेरणा देणारा असतो,१९७५ या वर्षी संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले पुढे १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध देशातील सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार व जागतिक शांतता या हेतूने साजरा केला जावा असे आव्हान करत "८ मार्च जागतिक महिला दिन" मोठ्या गौरवाने हा दिवस साजरा केला जातो. (या दिवसाला मोठा इतिहास आहे.) २०२४ या वर्षांच्या महिला दिनाची थीम "इन्स्पायर इनक्लूजन" आहे. (महिलांमध्ये गुंतवणूक करा,प्रगतीला गती द्या असा होतो) म्हणजेच सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या दृष्टीने महिला सक्षमीकरणासाठी गुंतवणूक करण्याच्या महत्त्वावर भर देते,याचाच अर्थ असा होतो की महिलांमध्ये उच्च शिक्षण व रोजगार यातील दरी कमी करणे,विशेष म्हणजे महिलांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण जरी वाढले असले तरी त्यांना रोजगाराच्या पाहिजे तशा संधी उपलब्ध न होणे यासाठी २०२४ यावर्षाची थीम "inspire inclusion" यावर आधारलेली आहे,आपल्या भारतात महिलांच्या रोजगाराचे प्रमाण खूपच कमी आहे,खरंतर बेरोजगारी ही मोठी समस्या जरी असली तरी भारतातील महिलांकडे समान शैक्षणिक पात्रता व क्षमता असूनही सामाजिक पूर्वग्रहांमुळे स्त्री-पुरुष हा भेदभाव आजही २१ व्या शतकातील आधुनिक युगात केला जातो,यावर प्रभावी अशी भूमिका शासनाची हवी, आज शैक्षणिक क्षेत्रातल्या उच्च शिक्षणातही मोठी तफावत आढळते, शहरी-ग्रामीण शिक्षण,लैंगिक असमानता,लिंग गुणोत्तर प्रमाण, रोजगार,आर्थिक,राजकीय व क्रीडा अशा अनेक बाबतीत असमानता असल्याने महिला सक्षमीकरणाची प्रभावी वाटचाल दिसून येत नाही, शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या महिला योजना,महिला धोरण याबाबतीत समाजात जनजागृतीसाठी आपल्या स्थानिक पातळीवर आपण महिला सक्षमीकरणासाठी जवाबदारी म्हणून स्वीकारली पाहिजे,विशेषता ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक बाबतीत दर्जा व संधी उपलब्ध होण्यास मदत करणे होय,आजच्या युगात महिला समानता ही संकल्पना समाजात प्रस्थापित होणं आपल्या युवा पिढीसाठी काळजी गरज असल्याने महिलांना शैक्षणिक, सामाजिक,राजकीय,आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं महत्वाचं आहे, त्याचबरोबर आपल्या व्यावाहरिक व दैनंदिन जीवनात नारी शक्ती ही अगदी सहजतेने व विविध भूमिका पार पाडत समाजाच्या एक आधारस्तंभ बनल्या आहेत,तिच्या प्रमुख भूमिकेमुळेचं एक आदर्श व क्रियाशील समाज निर्मितीसाठी मदत होते हे लक्षात घेत तिच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा व उपाययोजना करणं महत्वाचं आहे.

        'महिला सक्षमीकरण' कार्यक्रमांतर्गत क्रीडा क्षेत्रातही मुलींचे प्रमाण वाढले पाहिजे, जेणेकरून क्रीडा पंखांना जागतिक पातळीवर पाठबळ मिळेल,खरंतर आजही क्रीडा क्षेत्रात पाहिजे तसं प्रमाण किंवा संधी मुलींना उपलब्ध होत नाही त्यात ग्रामीण भागातील मुलींचा क्रीडा सहभाग हा बहुतेक कमीच दिसतो, क्रीडा क्षेत्राततील लिंग गुणोत्तर हे पुरुषांच्या बरोबरीने वाढले पाहिजे तेव्हाच क्रीडा क्षेत्राचा विकास खऱ्या अर्थानं झाला असं म्हणता येईल, मुलींच्या खेळामध्ये सहभागाबाबत बराच गैरसमज आजही दिसून येतो, तो दूर व्हावा यासाठी जनजागृती करणं,मुलींच्या सुदृढ,निरोगी व आनंददायी जीवनासाठी खेळाचे महत्त्व विशद करणं अशा काही गोष्टी घेवून समाजा विकासातील 'महिला सक्षमीकरणाची' एक बाजू भक्कम करणं आवश्यक आहे.राजमाता जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई,वीरांगना झलकारीबाई, सावित्रीबाई फुले,डॉ.आनंदीबाई जोशी,कल्पना चावला,इंदिरा गांधी,सरोजिनी नायडू, सुषमा स्वराज,फाल्गुनी नायर,गीता गोपीनाथ,लता मंगेशकर,श्रीदेवी, स्मिता पाटील,शकुंतला देवी,अरुंधती रॉय,इरोम शर्मिला,इंद्रा नूयी,किरण बेदी,सुधा मूर्ती,बरखा दत्त,लीना नायर,बहिणाबाई चौधरी, प्रतिभाताई पाटील,निर्मला सीतारामन, नीता अंबानी,संगीता भल्ला,मेरी कोम,सायना नेहवाल,सानिया मिर्झा,गीता फोगाट,विनेश फोगाट,साक्षी मल्लिक,मिताली राज,पी.व्ही.सिंधू,झुलन गोस्वामी, दीपा कुमारी,निकत झरीन,अवनी लेखरा,मनू भाकर,मीरा बाई चानु,अशा अनेक महिला खेळाडूंनी आप-आपल्या क्षेत्रात यशोशिखरे गाठत यशस्वी झाल्या आणि हिचं प्रेरणा घेऊन अनेक महिला स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे अशा सर्व महिलांना माझा ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त लाख-लाख सलाम,प्रत्येक क्षेत्रात 'महिला सक्षमीकरण' या कार्यक्रमांतर्गत नारी शक्तीला इन्स्पायर इनक्लूजन म्हणजेच महिलांच्या शिक्षण व रोजगार आदी सर्वसमावेशक बाबत समावेशाला प्रेरणा देणे व विविध क्षेत्रात महिलांचे सक्षमीकरण घडवून आणणे होय आणि हिचं खरी महिला सक्षमीकरणाची प्रभावी वाटचाल असेल.





भरत कोळी

(शारीरिक शिक्षण शिक्षक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक,धुळे)

_____________________________________________


'महिला सक्षमीकरणाची' संकल्पना समजुन घेत महिलांच्या विकासासाठी समाजाने एकत्र येत महिलांसाठी पोषक वातावरण तयार करणं,हाच ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्यासाठी शुभेच्छा असतील.


ऋषिकेश अहिरे

(सारथी संस्था,धुळे)


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

"धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा प्रवास म्हणजे संघर्षमय आणि प्रेरणादायी... "