"पालकांनो मुलांकडे दुर्लक्ष करू नका"




*भरत कोळी*

*(शारीरिक शिक्षण शिक्षक,धुळे/बॉक्सिंग प्रशिक्षक)*



*"पालकांनो मुलांकडे दुर्लक्ष करू नका.."*


धुळे- २१ व्या शतकातील आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मानवी जीवन हे धावत्या ट्रेनप्रमाणेचं वेगवान असेल असं मला कधी वाटलं नव्हतं, खरंतर महामूर्ख कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मानवी समाजाची जी गतिशील वाटचाल सुरू झाली ती मानवाला कुठं नेऊन सोडेल याची शाश्वती देता येणार पण २१ व्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपण विविध प्रकारे अधिकाधिक सर्तक असणं आवश्यक आहे कारण कधी कोणत्या संकटांना सामोरे जावं लागेल हे सांगता येणं ही थोडं अवघडच आहे, असो पण आजच्या आधुनिक युगात मानवाची वाटचाल ही गरजेनुसार व परिस्थितीनुसार निरंतर चालणारी प्रक्रिया हवी, पण हल्ली या प्रक्रियेचा हेतू बदलत एका विशिष्ट तऱ्हेने समाजाची वाटचाल ही अधोगतीकडे  जात आहे की काय अशी वेळोवेळी शंका-प्रश्न निर्माण होतात, आजच्या २१ व्या शतकातात जरी विज्ञान,तंत्रज्ञानाच्या आधारावर आधुनिकीकरणाला,  जागतिकीकरणाला, खाजगीकरणाला गती मिळाली असली तरी ती गती समाजासाठी फायदेशीर ठरेलचं अशी १००% शाश्वती देता येणं ही माझ्यामते कठीणचं आहे,म्हणुन आपल्या मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवा, त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहा भविष्यात निर्माण होणाऱ्या संकटांना सामोरे जाऊ शकतील असं सक्षम बनवा,त्याच्यातील कलागुण ओळखा व त्याला वाव द्या,त्याचा शारीरिक मानसिक,भावनिक,बौद्धिक,आर्थिक व सामाजिक विकास कसा होईल याकडे पालक म्हणून सातत्याने लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं,कारण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मुलांची अवस्था ही कमी वेळेत अधिकाधिक यश संपादन करण्यावर असते मग त्यासाठी ते विविध मार्ग अवलंबतात कधी-कधी यश मिळते तर अनेकदा अपयशाला सामोरे जातात मग इथूनचं बऱ्याच समस्या आपल्या समोर उभ्या राहतात त्यामुळे पालकांनी जरा वेळ काढून आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि अजिबात दुर्लक्ष करू नका.


*खालील काही मुद्दे पालकांनी लक्षात घ्यावे.*


*मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.* - आजच्या काळात जो शारीरिक व मानसिक आरोग्याने चांगला असेल तो भविष्याच्या दृष्टीने अधिकाधिक सक्षम असेल कारण आरोग्याने सुदृढ असलेला व्यक्ती हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या न थकता विविध समस्यांना सहज सामोरे जात यशस्वी होत असतो,म्हणून आपल्या मुलांना दररोज एक तास मैदानावर पाठवा,त्याला आवडेल त्या खेळात सक्रिय राहु द्या,भरपुर खेळू द्या,कारण मैदानावर त्याच्या मुलभूत हालचाली होतात त्यामुळे शारीरिक विकास साधला जातो,विविध खेळ खेळण्यासाठी विविध कौशल्य असणं आवश्यक असतात आणि त्यासाठी ते नेहमीचं प्रयत्न करतात आणि यातूनच त्यांचा मानसिक विकास होत असतो, म्हणून आपल्या मुलांना किमान एक तास त्यांना मैदानावर त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सक्रिय राहु द्या.


*मुलांना आरामदायी जीवनशैलीकडून आनंददायी जीवनशैलीकडे नेण्याची गरज.* - आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्याला काय हवं ते शरीराची हालचाल न होता जागच्या-जागी उपलब्ध होईल अशी व्यवस्था २१ व्या आधुनिक विज्ञान,तंत्रज्ञानाच्या युगात निर्माण झाली आहे,खरंतर विज्ञानाचे कौतुक केलं पाहिजे कारण विज्ञानामुळेचे मानवी समाजाची प्रगती होऊ शकली,विज्ञान नसते तर आपण आजही एकमेकांच्या संपर्कात आलो नसतो असो पण कुठंतरी आपण विज्ञानाचा गैरफायदा घेतोय की काय असं मला वाटतं,कारण मोबाईलमुळे बऱ्यापैकी शारीरिक हालचाली कमी झाल्या आणि शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत एकमेकांच्या सहवासात राहण्याची  सवयी मागे पडल्या,मोबाईल मुळे आरामदायी जीवनशैलीची सवय अधिक लागली,आनंद व्यक्त करण्याचा मार्ग आपण विसरलो,अशा अनेक बाबी आहेत,त्यात मोटारसायकल,लिफ्ट,प्रत्यक्ष मैदानावर न खेळता,न अनुभव घेता मोबाईल, गेम झोन मध्ये घालवलेला वेळ अशा विविध बाजूंनी मुलांना आरामदायी जीवनशैलीची सवय लागत आहे, यापेक्षा त्यांना आनंदी वातावरणात आपण कसं नेऊ शकतो आणि त्यातुन त्यांना आनंददायी जीवनशैलीची सवय लागू शकते याचा विचार आपण करायला हवा.


*शाळेच्या नियमांचे पालन न करणे म्हणजे अधोगती कडे जाण्यासारखेच होय.*

शाळा म्हणजे मुलांच्या भविष्याला विकसित आकार देणारी शैक्षणिक गंगा प्रणाली होय, खरंतर असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही, कारण शालेय स्तरावर होणारा सर्वांगीण विकास हा मुलांना विविध क्षेत्रात यशस्वी बनवत असतो, म्हणून शाळेचं महत्त्व हे पालकांनी लक्षात घ्यावं,शाळेचे जे काही नियम अटी असतात ते मुलांच्या विकसित व सुदृढ भविष्यासाठीचं असतात हे लक्षात घेत मुलांना शाळेच्या नियमांचे पालन करतील यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या, शाळेत वेळेवर येणं,गैरहजर न राहणे, गृहपाठ करणे,शिक्षकांचा आदर करणे,स्वच्छ्ता,संघशक्ती व इतर काही नियमाचे पालन करणे अशा अनेक गोष्टींमुळे भविष्यात समाजामध्ये एक वेगळे स्थान मुलांचे निर्माण होते, उत्कृष्ट नागरिक म्हणून समाजात वावरू शकतो,व्यसनाकडे न जाता स्वतःचा विकास कसा होईल याकडे तो लक्ष केंद्रित करत असतो म्हणून पालकांनी शाळेला सहकार्य करणं आवश्यकचं आहे.


*सोशल मीडियाचा वाढता वापरावर आपण लक्ष दिलं पाहिजे.*

- आजच्या युगात अगदी लहानणापासूनच मुलांच्या हातात मोबाईल दिसतो आणि त्यांचे बऱ्यापैकी अतिशय घातक असे परिणाम आपल्या समोर दिसून आले आहेत,असो पण मैदानावर सक्रिय राहण्याच्या वयात जर ते सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहत असतील तर आपण पालक म्हणून सातत्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण याचे दुष्परिणाम हे त्यांचे भविष्य उध्वस्त करु शकते, म्हणुन आतापासून सावधगिरी आपण बाळगली पाहिजे,सोशल मीडिया मुळे होणारे संबंध, शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम अशा अनेक बाबी आहेत,शालेय स्तरावरील मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा पुस्तक,खेळाची साहित्य किंवा त्यांना आनंददायी जीवनशैलीची सवयी लावणाऱ्या गोष्टी आपण दिल्या पाहिजे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातील पालक हा मुलांच्या भविष्याच्या सक्रिय असणं अतिआवश्यक आहे.



*मुलांना वेळ द्या.*- बहुतेकदा आपण आपल्या कामानिमित्त मुलांना वेळ देत नाही,त्यांच्याशी मोकळ्यापणाने बोलत नाही अशा अनेक बाबीमुळे त्यांना एकटेपणाची जाणीव होते, मोबाईल हातात आल्यामुळे आजकाल मुलांचा मित्र परिवार हा कमी झाला आहे, मग अशा स्थितीत आपण मित्र म्हणून त्याच्याशी बोलायला हवं,त्यांना चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन द्यायला हवं,सुट्टीच्या दिवशी त्यांना शैक्षणिक, नैसर्गिक किंवा त्यांच्या आवडीच्या ठिकाणी घेवून जायला हवं त्यातून त्यांच्या मनातील नकारात्मक विचार हे बाजूला जातात आणि त्यातून तूम्ही सकारात्मक दृष्टिकोन प्रस्थापित करु शकतात,मुलांसोबत मैदानावर जा, खेळा,अवांतर विषयाशी संबंधित गप्पा गोष्टी करा, संस्कृती विषयी बोला, त्यातून मुलांना प्रेरणा मिळत असते.


*मुलांचे कलागुण ओळखा*- आजच्या मुलांची बौद्धिक पातळी ही अधिक विकसित दिसते,कारण याला बऱ्यापैकी आधुनिक विज्ञान,तंत्रज्ञान जवाबदार आहे,असो पण प्रत्येक मुलांकडे काहीना-काही कलागुण, क्रीडागुण असतात आणि ते आपण चांगल्यापैकी ओळखू शकतो, त्यामुळे त्यांच्यावर आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी लादणे हे त्यांच्या विकासासाठी सतत अपयशी ठरत असतात,त्यामुळे त्यांना काय आवडतं,त्याचा आनंद कोणत्या क्षेत्रात अधिक आहे हे आपण ओळखलं पाहिजे,यासाठी आपण शिक्षकांची मदत घेऊ शकतो, त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊ शकतो. मुलांचे उज्वल भविष्य त्यांच्या कलागुणांवर अवलंबून आहे आणि आपण त्यांच्या कलागुणाकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही.




*"पालक म्हणून आपण सातत्याने त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर मुलांच्या आवडी-निवडी आपण ओळखल्या पाहिजे,जेणेकरून ते भविष्यात यशस्वी होऊ शकतील, समाजात अभिमानाने वावरू शकतील."*


*पुनम सोनवणे*

*(शारीरिक शिक्षण शिक्षिका,नाशिक)*




*"आजच्या आधुनिक युगातील पालकांनी शाळेला सहकार्य करणं आवश्यक आहे,कारण छळीची भिती वाटत नसल्याने शिक्षक व विद्यार्थीमध्ये असलेला आदर हा कुठं तरी हरपतोय की काय असं कधी-कधी वाटतं"*


*ऋषिकेश अहिरे*

*(सचिव -सारथी मित्र परीवार,धुळे)*



*"मुलांना मैदानावर खेळण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे, त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी जेणेकरून भविष्यातील अडथळ्यांना सहज सामोरे जाऊ शकतील."*


*करण गोरखा*

*(शारीरिक शिक्षण शिक्षक,नाशिक)*


News

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन व हस्ती पब्लिक स्कूल, दोडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला बॉक्सिंग स्पर्धा – २०२५