खेळाडूंचे उपोषण : क्रीडा संघटना ह्या खेळाडूंच्या हितासाठीच असतात.


"खेळाडूंचे उपोषण : क्रीडा संघटना ह्या खेळाडूंच्या हितासाठीच असतात."



धुळे- खेळ,खेळाडू व संघटना आणि गंभीर आरोपांच्या वादात अडकलेल्या कुस्ती महासंघाचे भविष्य पुढे काय असणार यावर विविध खेळातील आजी-माजी खेळाडू,क्रीडा अभ्यासक, क्रीडा तज्ञ यांनी आप-आपले मत व्यक्त करत क्रीडा संघटनेचे स्वरूप,व्याप्ती व संघटन यावर अनेक प्रकारे चर्चा रंगल्या होत्या, खरंतर जो कुस्ती खेळ घरा-घरात परिचित होता, कुस्तीचे शौकीन होते,पैलवानीचा नाद होता नावासमोर पैलवान शब्द लागला की एक वेगळी ओळख समाजात निर्माण होते,अशा कुस्तीचे खेळाचे भविष्य अंधारात नेण्यासारखेच मागील काही दिवसांत झाले आणि ही बाब भारतीय क्रीडा संस्कृतीला अतिशय लाजिरवाणी ठरली,भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष तथा खासदार ब्रजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप व इतर काही आरोप अर्जून पुरस्कार विजेती तथा ऑलिम्पिकपटू विनेश फोगाट हिने केला,त्याचबरोबर २०१६ ची रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मल्लिक,टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पूनिया,रवि दहिया त्याचबरोबर दिपक पुनिया, अंशू मल्लिक अशा अनेक कुस्तीपटूंनी केला आणि यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या जंतर-मंतरवर अनेक कुस्ती कुस्तीपटूं एकत्र येत त्यांना पाठींबा दिला,या दरम्यान लैंगिक शोषण झालेल्या दोन महिला खेळाडू ही उपस्थित होते,ह्या आंदोलनाला फार मोठ्या संख्येने कुस्तीगीर एकत्र आल्याने अध्यक्षपद हटाव,अध्यक्ष मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या,या आंदोलनाला राजकिय रंग लागू नये म्हणून आंतरराष्ट्रीय माजी कुस्तीपटू बबिता फोगाट व इतर काही लोकांनी मध्यस्थी करत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची खेळाडूसमवेत भेट घेत संवाद साधला त्यावर त्यांनी केंद्रीय समिती त्वरित स्थापन करत पुढील कारवाई करण्याचे संकेत दिले,हे आरोप सिद्ध झाल्यास भारतीय क्रीडा संस्कृतीसाठी फार लाजिरवाणी दिवस असेल, खरंतर हे आंदोलन कुस्तीसारख्या खेळाच्या अध्यक्षाविरोधात असल्याने भारतीय क्रीडा क्षेत्राकडे समाजाचा बघण्याच्या दुष्टिकोन हा कसा असेल....? यावर अनेक प्रश्न चिन्हे आज उभी राहिली आहेत, ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंनाही जर उपोषण(आंदोलन) करावं लागत असेल तर भारतीय क्रीडा क्षेत्राचे भविष्य अंधारात असेल की उजेडात असेल हे सांगता येणं फार अवघडचं वाटते. 

          ह्या आधुनिक युगात तर खेळाचा दर्जा हा अतिशय वेगाने वाढत आहे,स्पर्धात्मकता ही गतीशिल आहे,मैदानात,खेळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर व त्यामुळे खेळाडूंच्या कौशल्यात होणारे बदल अशा अनेक गोष्टींमुळे खेळाचा विकास सातत्याने होत असल्याने खेळाचं महत्व हळुहळू लोकांना पटत आहे, करिअरच्या मोठ्या संधी इथं उपलब्ध होत असल्यानेही विविध खेळ घरा- घरात पोहचत आहे आणि अशा स्थितीत हा प्रकार क्रीडा संस्कृतीला चालना देईल का यावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत,खरंतर तर हा सर्व प्रकार दुर्दैवी आहे हे सर्व कुस्तीपटू सराव सोडून आपल्यावर व इतर खेळाडूंवर झालेल्या अन्यायाविरोधात एकत्र जमली होती म्हणजेचं क्रीडा संघटने विरोधात आंदोलन आणि हे आंदोलन क्रीडा क्षेत्राला काळीमा लावणारे होते.यापूर्वी ही अनेकदा विविध क्रीडा संघटनेत खेळाडू विरुध्द संघटना असा संघर्ष विविध कारणांनी पाहायला मिळाला आहे,असे अनेक संघर्ष थेट कोर्टात गेले आहे, प्रशिक्षकांकडून होणारे अत्याचार, लैंगिक शोषणासारखे आरोप, खेळाडूंना स्पर्धेत सहभागाबाबत, त्यांच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप, पैशाची मागणी,क्रीडा सुविधेवरून, हक्कावरून व इतर काही बाबतीत अडवणूक असे अनेक प्रकार समोर येऊन ही २०२३ मध्ये एका मोठ्या क्रीडा संघटनेच्या अध्यक्षाकडून ह्या चूका होत असतील तर खेळाडूंच्या भविष्याला कोण वाचविणार असाही प्रश्न समोर आहे,जर असेचं प्रश्न पुढेही उद्भवत असतील तर खेळाडूंनी उपोषण (आंदोलन) करायचे की सराव आणि यानंतर त्यांची क्रीडा कारकीर्द संपुष्टात येईल अशी परिस्थिती आज डोळ्यासमोर आहे म्हणून कुठेतरी क्रीडा संघटनाचे नियमन प्राधिकरण हे खेळाडूंच्या हितासाठीच हवे अस मला वाटतं,काळानुसार बदलत जाणारी पायवाट क्रीडा संघटनांनी बदलावी आणि खास करुन खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनात हस्तक्षेप करणं प्रामुख्याने टाळावेचं,खेळाडूंनी कुठं सहभाग घ्यावा कुठं नाही यावर त्याचे स्वतःचे अंकुश असावे,सरावाबाबत त्याचा पुर्ण अधिकार,निर्णय त्यांच्याकडे असावे (काही क्रीडा शिबिर सोडून) व पैशासाठी होणारी पिळवणूक ही आज डोके दुःखी ठरलेली आहे,क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सतत होणारी मनमानी,खेळाडूंचे हित लक्षात न घेता, संघटनेने केलेले नियमन,संघटनेत राजकीय हस्तक्षेप,पंचामध्ये पारदर्शकता नसणे अशा अनेक बाबीमुळे बऱ्याच खेळाडूंचे मोठ्या नुकसान झाले आहे,खेळाडूंच्या यशस्वीमुळेचं क्रीडा संघटना नावारूपाला येतात हे नेहमीचं क्रीडा संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

            खेळाडूंच्या हिताचा विचार नक्कीच व्हावा, मागील काही वर्षांपासून क्रीडा संघटनाच्या बैठकीत राजकीय पक्षांसारखेचं वातावरण भरलेलं असतं,क्रीडा संघटनेच्या संघटनेच्या निवडणुकांनाही राजकीय रंग लागतो, क्रीडा संघटनेत राजकीय लोकांचा होणारा हस्तक्षेप हा भारतीय क्रीडा संस्कृतीसाठी योग्य नाहीच, आज क्रीडा संघटनेत खेळाडूंच्या हिताच्या दृष्टीने विचार करणाऱ्या लोकांची फार कमतरता दिसते, खेळाच्या विकासाच्या दृष्टीने व खेळाडूंच्या बाजूने बोलणारी मंडळी ही या राजकीय लोकांच्या शिकार होतात त्यामुळे ते क्रीडा संघटनेपासुन दूर जातात,हल्ली अनेक क्रीडा संघटनांचे वाद हे चव्हाट्यावर आहेत,काही लोकं क्रीडा संघटनेचा म्होरक्या म्हणून गुणवत्ता नसतांना स्वतःला पाहतात आणि इथचं क्रीडा संघटनेच्या अधोगतीला सुरूवात होते,खरंतर "जो चुकतो तोच शिकतो" ह्या म्हणी प्रमाणेच चूका ह्या प्रत्येकाकडून थोड्याफार प्रमाणात होतात,चुका सुधारण्याची संधी ही प्रत्येकाला दिली गेलीच पाहिजे,संघटनेत सुद्धा प्रत्येक व्यक्ती हा खेळाडू विरोधी नसतो, चांगलीही लोकं मी पाहिली आहे की ज्यांच्यामुळे खेळाचा विकास झाला आहे आणि त्या खेळाचा दर्जा हा वाढत त्या खेळातील अनेक खेळाडूंनी विजयाचे शिखरे गाठली आहेत असे अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील,असो पण खेळाडू हे प्रचंड मेहनतीने व मोठ्या संघर्षाने पुढे येत मैदानात विजयासाठी लढतात त्यामुळे त्यांच्या मेहनतीला,संघर्षाला न्याय मिळायलाच हवा,खेळाडूंचे उपोषण हे क्रीडा विकासासाठी घातक.



*"संघटना विरुध्द खेळाडू असा वाद" हा नवीन नाही पण लैंगिक शोषणासारखा वाद/आरोप हा क्रीडा क्षेत्राला नक्कीच काळीमा लावेल."*


-भरत कोळी*

(शारीरिक शिक्षण शिक्षक,धुळे)



*"क्रीडा संघटनांनी खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे,त्यांच्या अडचणी न जाणून घेणे,खेळाडूंना विविध बाबतीत अडविणे असा प्रकार जर वारंवार होत असेल तर अनेक पदकांचे दावेदारी ठेवणारे खेळाडू क्रीडा क्षेत्राला रामराम ठोकतील."* 


-पुनम सोनवणे

(शारीरिक शिक्षण शिक्षिका,नाशिक)



*"क्रीडा संघटनेत जे काही नियमन होईल ते खेळाडूंच्या हितासाठीच असले पाहिजे कारण क्रीडा संघटना ह्या खेळाडूसाठी असतात त्यामुळे त्यांचे हित पाहणं ही प्राथमिकता क्रीडा संघटनेची आहे."*


-ऋषिकेश अहिरे

(क्रीडा संघटक,धुळे)



*"क्रीडा क्षेत्रात लैंगिक अत्याचाराचे प्रकरण हे अतिशय लाजीरवाणे आहे,आणि अशा गोष्टींमुळेच मुलींचे प्रमाण क्रीडा क्षेत्राकडे कमी दिसते,त्यामुळे महिला खेळाडूंनी पुढे येत अशा घटना विरोधात आवाज उठवला पाहिजे."*


-करण गोरखा

(फुटबॉल प्रशिक्षक,नाशिक)




*"खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या क्रीडा संघटना देशात विकसित झाल्या तर ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला सतत पदके मिळत जातील."*


-रणजित देवकर

(शारीरक शिक्षण शिक्षक व क्रीडा संचालक,पुणे)









भरत कोळी

(शारीरिक शिक्षण शिक्षक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक,धुळे)

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी आ.प्रविण दरेकर, उपाध्यक्षपदी डॉ. तुषार रंधे, तर मयुर बोरसे यांची विभागीय सचिव म्हणून निवड

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या विजयी पॅनेलचा भव्य सत्कार

"धुळे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा प्रवास म्हणजे संघर्षमय आणि प्रेरणादायी... "