महिलांना देऊया क्रीडा स्वातंत्र्य - भरत कोळी
"महिलांना देऊया क्रीडा स्वातंत्र्य."
- देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे या म्हणीप्रमाणे समाजाला नेहमीचं प्रबोधन करावं लागतं, आज जागतिक पातळीवरील विविध क्षेत्रात महिलांचे योगदान हे अमूल्य ठेवा आहे असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांच्या योगदानाने त्या-त्या क्षेत्रात नवीन काहीतरी कार्य करण्यासाठी मानवी समाजाला दिशा व प्रेरणा मिळते, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांवर झालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेमागे जिजाऊ मातेचा संघर्ष व त्यांचे योगदान कधी विसरता येणार नाही व त्या योगदानाचा समस्त भारतीय समाज नेहमीचं गौरव करत राहिल, ब्रिटिशांशी दोन हात करणाऱ्या राणी लक्ष्मी बाई, झलकारीबाई यांचे मैदानावरील रौद्र अवतार आणि रणरागिणीसारखा लढा न विसरण्यासारखा आहे, संपुर्ण समाजाला सुशिक्षित बनविण्यासाठी व मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी शिक्षण क्षेत्रात संघर्ष करत पहिल्या महिला शिक्षिका म्हणून कार्य केलं त्या सावित्रीबाई फुले यांना नतमस्तक होऊन जागतिक महिला दिनाच्या सर्व नारी शक्तीला शुभेच्छा.
दरवर्षी ८ मार्च हा जागतिक व्यासपीठावर जागतिक महिला दिन म्हणून संपुर्ण जगात महिला शक्तीच्या कार्याचा गौरव करत साजरा केला जातो,हा दिवस साजरा करण्यामागे ही बराच इतिहास आहे, महिलांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी उभारलेला लढा आणि त्याला मिळालेल्या यशाच्या प्रेरणेतून १९१० पासुन ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो, असो पण हा दिवस साजरा करण्यामागे काय उद्दिष्टे आहेत हे समजून घेतल्यास बऱ्याच बाबी समोर येतात, आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी यशोशिखरे गाठली आहेत, शैक्षणिक, व्यावसायिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक व क्रीडा अशा विविध क्षेत्रात महिलांचे योगदान हे नारी शक्तीचे संघटित सामर्थ्य दाखवून देते,खरंतर ही बाब देशांच्या विकासासाठी अतिशय महत्वाची ठरते, अगदी महाभारत, रामायण व भारताच्या इतिहास काळातील महिलांचे योगदान हे विविध प्रकारे दिले आहे, पण इतिहासाच्या पानांची साक्ष ही नेहमीचं मनाला अस्वस्थ करत असते कारण अलीकडच्या काही काळात भारतीय संस्कृतीत पुरुषांचे वर्चस्व हे पुरूष प्रधान संस्कृतीच्या वातावरणासाठी बऱ्याच प्रमाणात पोषक ठरले होते त्यामुळे महिलांचे जीवन हे फक्त 'चूल आणि मूल' यासाठीच आहे असं म्हटलं जात असताना पडदा संस्कृती पुढे आली आणि त्यामुळे महिलांच्या संरक्षणाबाबतच्या समस्या पुढे येऊ लागल्या, लिंग गुणोत्तराच्या बऱ्याच समस्या निर्माण झाल्या, स्त्री-पुरुष असमानता, महिलांच्या बाबतीत बघण्याचा दुष्टीकोन अशा अनेक प्रकारच्या समस्या पुढे येत गेल्यामुळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक व क्रीडा क्षेत्रात मागील काही वर्षांपासून महिलांचे सबलीकरण व्हावे यासाठी शासन स्तरावरून व विविध सामजिक संघटनाच्या माध्यमातुन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याने नारी शक्तीचे बळ पुन्हा दिसायला मिळत आहे आणि नारी शक्तीचा सन्मान हेचं भारतीय संस्कृतीचे खरे प्रतीक आहे असं म्हणायला हरकत नाही,असो पण क्रीडा क्षेत्रातही महिलांचे सबलीकरण हे त्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक सामाजिक विकासासाठी व्हावं या अपेक्षेने २०२३ चा ८ मार्च जागतिक महिला दिन आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत.
जागतिक पातळीवरील क्रीडा क्षेत्रात भारतीय महिला खेळाडूंच्या यशस्वीतेचा आलेख उंचावत असल्याने समाधान खुप वाटतं,६ वेळेची जगविजेती, सुपर मॉम एम.सी.मेरी कोम, दोन ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू, ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मल्लिक, अथलेटिक्स खेळाडू पी. टी उषा, अंजू बॉबी जॉर्ज, हिमा दास, कविता राऊत ,ललिता बाबर, फुलराणी सायना नेहवाल, पैलवान गीता फोगट, वीनेश फोगट, बबिता फोगट, संगिता फोगट, ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सिंग पटू लवलीना बोरोगव्हो, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानु, टेनिसपटू सानिया मिर्झा, क्रिकेट पटू मिताली राज, स्मुती मंनधना, हरमनप्रीत कौर, झुलन गोस्वामी, हॉकीपटू राणी रामपाल, गुरजीत कौर, सुशीला चाणु, नवनीत कौर, वंदना कटारिया, टेबल-टेनिस मनिका बत्रा अंकिता दास, आर्चरी खेळाडू दीपिका कुमारी
अनेक महिला खेळाडूंनी देशाचं प्रतिनिधित्व करत संपुर्ण जगात भारताचे नावलौकिक केलं आहे, अनेकांना तर बऱ्याच संघर्षाना सामोरे जावं लागलं आहे,मुलींना मैदानावर पाठवलं तर समाज काय म्हणेल अशा ह्या छोट्या दुष्टिकोनामुळे अनेक महिला खेळाडूंचे क्रीडा पंख आकाशात भरारी घेऊ शकले नाही, तिचं भविष्य हे फक्त 'चूल आणि मुल' या पडद्याआड संस्कृतीला चालना देणाऱ्या लोकांच्या मानसिकतेमुळे बरेचं बलशाली पंख छाटले गेले,पण २१ व्या शतकाच्या आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना स्त्री- पुरुष असमानता नकोच, कारण देशाच्या विकासात नारी शक्तीचे योगदान हे अमूल्य आहे,भारतीय समाजाने महिलांच्या हक्कासाठी लढा दिलाच पाहिजे,त्यांना प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक संधी दिली गेली पाहिजे, महिलांचे क्रीडा सबलीकरणासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजे यासाठी समाजाने एकत्र येऊन महिलांना क्रीडा स्वातंत्र्य दिले पाहिजे जेणेकरून तिचं स्वतःचं अस्तित्व ती निर्माण करू शकेल, स्वतःचे संरक्षण ती करू शकेल,तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राखू शकेल असे विविध दुष्टिकोन ठेवून जर मैदानाच्या वाटा तिच्यासाठी खुल्या झाल्या तर भारतीय महिला खेळाडूंची ताकद ही संपूर्ण जगात बलाढ्य स्वरूपाची राहिल यात शंका नाही,आज शहरी भागात मुलींच्या क्रीडा भविष्याबाबत पालक समाज जागृत होत असल्याने भारतीय नारी शक्तीचे सामर्थ्य अधिक प्रभावी होत जाईल पण अजूनही ग्रामीण भागातील महिला खेळाडूंकडे दुर्लक्ष हे त्या ग्रामीण भागातील क्रीडा पंखांना कमकुवत बनवत आहे,ग्रामीण भागात महिलांच्या क्रीडा हक्कासाठी आमचा लढा नक्कीच यशस्वी होईल या आशेने 'मेरी देश की बेटी मैदान की राणी' या माध्यमातुन माझ्या समस्त समाजाला एक विनंती राहिल की आपल्या मुलींना मैदानावर पाठवा त्यांना शारीरिक व मानसिक बलशाली बनवा, थोडं क्रीडा स्वातंत्र्य द्या तुमचं, तुमच्या समाजाचं व देशाचं ती नावलौकिक करेल 'चुल आणि मूल' या पडद्या आड संस्कृतीला चालना देण्यापेक्षा तिच्या क्रीडा पंखांना बळ दिलं तर यशाची शिखरे पार करण्यासाठी तिचे पंख आकाशात उंच गगन भरारी घेतील यात शंका नाही म्हणून थोडं विचार करा आणि आपण सारे मिळून महिलांना देऊया क्रीडा स्वातंत्र्य या उपक्रमात सहभागी होत भारतीय नारी शक्तीचे क्रीडा सामर्थ्य वाढवूया व ८ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या अभिमानाने साजरा करूया.
भरत कोळी
(शारीरिक शिक्षण शिक्षक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक)
"मुलींना मैदानावर पाठवलं तर ती शारीरिक रित्या स्वतःचे संरक्षण करू शकेल,तिला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नसेल."
-पुनम सोनवणे
(शारीरिक शिक्षण शिक्षिका,नाशिक)
"'चुल आणि मूल' ह्या पलीकडे स्त्रीचे आयुष्य खूप मोठं आहे,त्यामुळे तिला हवं ते स्वातंत्र्य असायला हवं जेणेकरुन स्वतःचे अस्तित्व ती निर्माण करू शकेल."
-श्रध्दा सपकाळे
(शारीरिक शिक्षण शिक्षिका, पुणे)



Comments
Post a Comment