"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-२)
"सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी"(भाग-२)
आपण सर्वांगीण विकास:शारीरिक शिक्षण आणि प्रभावी अंमलबजावणी या लेख मालिकेच्या भाग १ मध्ये सर्वांगीण विकासाबाबत चर्चा केली आणि यावरुनचं आपल्याला असं लक्षात येतं की शालेय स्तरावरील 'सर्वांगीण विकास' हा मुलांच्या शारीरिक व मानसिक व्यक्तिमत्वाला एक यशस्वीतेचा आकार देण्याचे कार्य नियमितपणे करत असतो म्हणून शालेय स्तरावर आकार देणाऱ्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया ही प्रभावी असायला हवी,खरंतर ज्याप्रमाणे सर्वांसाठी शिक्षण हा देशाच्या शिक्षणविषयक इतिहासामध्ये एक महत्वाचा टप्पा आहे,त्याचंप्रमाणे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत 'सर्वांगीण विकास' हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे,सर्वांगीण विकास हा शिक्षणाचा एक व्यापक दृष्टीकोन आहे,शिक्षण हे जीवनाभिमुख असून जीवनाची पूर्वतयारी शिक्षण असल्याने शालेय स्तरावरील वयोगट ३ ते ७, ८ ते १४ वर्षांच्या विद्यार्थ्यांचा मुलभूत हालचालींचा विकास व कारक कौशल्याचा विकास हा उत्तमरित्या होत असल्यामुळे शारीरिक,मानसिक क्षमतेसह बौद्धिक,भावनिक व सामाजिक आदी मुल्यांचा विकास होतो, विशेषता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० हे सुद्धा सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेवर आधारलेले आहे,अभ्यासक्रमात विविध आनंदी उपक्रमांची सांगड,पाठ्यपुस्तकातील घटक हे बौद्धिक क्षमतेला चालना देणाऱ्या उपक्रमांचा अंतर्भूत अभ्यासक्रम अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिसतो पण ह्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे.
सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या शारीरिक व मानसिक क्षमतांना ओळखून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह इतर अंतर्भूत असलेल्या विकासाच्या दृष्टीने राबविलेली प्रक्रिया म्हणजे 'सर्वांगीण विकास' होय,जी विद्यार्थ्यांना निरोगी व आनंदी जीवनशैली प्रधान करते.त्यामूळे शालेय स्तरावर राबविण्यात येणारे बहूतेक उपक्रम हे सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेवर आधारित असतात हे लक्षात घेऊनचं शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण हा विषय अधिक प्रभावी करावा असं मला वाटतं, विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक,शारीरिक व मानसिक आरोग्याचे पालनपोषण करण्याची जवाबदारी सुद्धा शारीरिक शिक्षण हा विषय घेत असल्याने,विद्यार्थ्यांच्या अवती-भोवती सुरक्षित,आरामदायी व आनंददायी असं वातावरण तयार होते आणि त्याचंबरोबर मुलांची वाढ आणि विकास ही प्रक्रिया सुलभ होत शिकण्यास मदत होते.सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून मुलांची व्यावहारिक/दैनंदिन जीवनातील ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करता येतात,नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रगत अशी कौशल्ये क्षमता आत्मसात करता येऊ शकतात त्यामुळे सर्वांगीण विकासाची प्रक्रिया समजून घेणं आवश्यक आहे,मुलांच्या पाठीवरच्या दप्तरांचे ओझं वाढवून, शाळेच्या आवारात फेरफटका मारायला लावणारं शिक्षण, ऑनलाइनचं मोहमाया दाखवणारं शिक्षणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकत नाही त्यामुळे सर्वांगीण विकासाची प्रक्रिया समजून घेऊन मुलांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होत 'बहुरंगी कौशल्ये' बाहेर आली पाहिजेत,कधी-कधी पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे जाऊन जीवनात येणाऱ्या अनुभवांची शिदोरी शिक्षण ही दिलं गेलं पाहिजे,मुलांमध्ये गणित,भाषा(लेखन,वाचन), विज्ञानाचे प्रयोग,तंत्रज्ञान,संगणक,साहित्य,दळणवळण,निसर्ग पर्यावरण,उद्योजकता, क्रीडा,नेतृत्व, इतर काही कला रंगमंच असे अनेक गुण मुलांमध्ये असतात आणि हे गुण आपल्याला शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातुन हेरता येतात, फक्त शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातुनचं नव्हे तर शालेय स्तरावर शिकविण्यात येणाऱ्या प्रत्येक विषयाच्या माध्यमातुन, विविध उपक्रमांतून मुलांचे कलागुण आपल्याला ओळखता येऊ शकतात त्यामुळे सर्वांगीण विकासाची प्रक्रिया समजून घेणं महत्वाचं आहे.खरंतर आज शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्दिष्टासाठी आणि त्याच्या पूर्ततेसाठी विविध उपक्रमांचा अंतर्भाव शालेय स्तरावर झाला पाहिजे,त्यातूनचं मुलांचा शारीरिक,मानसिक,बौद्धिक,भावनिक, सामाजिक विकास होतो.
त्याचबरोबर शालेय स्तरावर शारीरिक शिक्षण विषयाच्या माध्यमातून विविध क्रीडा उपक्रमांची आखणी करत सर्वांगीण विकासाची प्रक्रिया अधिक प्रभावी होते, विशेषता खेळ हा शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग असल्याने शाळेत खेळाची आनंदी रेलचेल दिसते पण ती प्रभावी असते का..? हा मात्र प्रश्नच आहे, असो पण सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने उपचारात्मक असा कार्यक्रम शालेय स्तरावर राबवता येऊ शकतो,
(भाग ३ मध्ये पुन्हा भेटू)
भरत कोळी
(शारीरिक शिक्षण शिक्षक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक,धुळे)


Comments
Post a Comment